देऊळगाव राजा :- तालुक्यातील बायगाव बु. येथे झालेल्या जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत रवी प्रदीप पवार (वय २१, रा. मोटेगाव, ता. रिसोड, जि. वाशिम), नीलेश जगन शिंदे (वय २५) आणि उमेश जगन शिंदे (वय २३, रा. धानोरी, ता. चिखली) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ४.७७ लाख रुपये), ८० ग्रॅम चांदीचे दागिने, ५१ हजार रुपये रोख तसेच सोन्याची लगडी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत.