देऊळगावराजा : शहरातील गजबजलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोरच भरदिवसा एका युवकाला चार ते पाच जणांनी जबरदस्तीने इनोव्हा कारमध्ये बसवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधितांनी आपण एलसीबी पोलीस असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने युवकाला वाहनात ओढल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे देऊळगाव राजा शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, हा अपहरणाचा प्रकार आहे की परराज्यातील पोलिसांची कारवाई, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही येथील अनिरुद्ध मधुकर शिंगणे (वय ३२) हे प्लॉट खरेदीच्या कामानिमित्त देऊळगाव राजा येथे आले होते. याचदरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयासमोर इनोव्हा कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना गाठले. आपण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत चौकशी करायची असल्याचे नमूद करून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविण्यात आले. यावेळी अनिरुद्ध यांचे मामा उद्धव चेके यांच्यासमोरच धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शिंगणे यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नातेवाईकांनी तातडीने देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवित शहरासह परिसरात नाकाबंदी केली. संबंधित वाहनाच्या लोकेशनच्या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात आली. या शोधादरम्यान हिवरा आश्रम परिसरातील लव्हाळा येथे सिल्व्हर रंगाची संबंधित इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात वापरण्यात आलेली इनोव्हा कार शहरातील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, संबंधित वाहनाला नंबर प्लेट नसल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा संबंध तेलंगणा राज्यातील पोलिसांशी असल्याची माहिती पुढे येत असून, संबंधित व्यक्ती सिव्हिल ड्रेसमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्या-चांदीच्या व्यवसायाशी संबंधित व्यवहार तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा असली, तरी या बाबींची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तेलंगणा राज्यातील पोलिसांचे पथक बुलढाणा जिल्ह्यात कारवाईसाठी आले होते, तर त्यांनी स्थानिक देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला अथवा जिल्हा पोलीस प्रशासनाला याबाबत पूर्वकल्पना दिली होती का? परराज्यातील पोलिसांनी स्थानिक यंत्रणेला विश्वासात न घेता अशा प्रकारे कारवाई केली का? सिव्हिल ड्रेसमध्ये आणि कथित विना नंबर प्लेट वाहनातून एखाद्या नागरिकाला ताब्यात घेण्यामागील नेमकी कायदेशीर प्रक्रिया कोणती होती? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. केवळ पोलीस असल्याचे सांगून एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने वाहनात बसवून नेण्याचा प्रकार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.