Headlines

नेवासा येथील सोयाबीन चोरीचे धागेदोरे देऊळगाव राजापर्यंत; तिघांना अटक, दोघे फरार; १ लाख २८ हजारांचे १८.८० क्विंटल सोयाबीन पोलिसांनी केले जप्त

देऊळगाव राजा : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शेतमाल चोरी करणाऱ्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या सोयाबीन चोरीप्रकरणाचा समांतर तपास करताना देऊळगाव राजा येथील पाच जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १८.८० क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले आहे. या सोयाबीनची किंमत १ लाख २८ हजार ७८० रुपये असून, अन्य दोन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशनमध्ये सोयाबीन चोरीप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (१), ३३१ (४) व इतर संबंधित कलमान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना चोरीच्या घटनेत देऊळगाव राजा येथील काही जणांचा सहभाग असल्याची माहिती तपासातून पुढे आली. तपासादरम्यान भानुदास बाबुराव गायकवाड (वय ३६), विनोद विठ्ठल काळे (वय २८), अंकुश तेजराव खंदारे (वय ४०), आकाश शंकर मोरे आणि बळीराम रावसाहेब फुके या पाच जणांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या कारवाईत भानुदास गायकवाड, विनोद काळे आणि अंकुश खंदारे या तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १८.८० क्विंटल सोयाबीन, ज्याची बाजारातील किंमत १ लाख २८ हजार ७८० रुपये आहे, ते जप्त करण्यात आले.
दरम्यान, या गुन्ह्यातील आकाश शंकर मोरे आणि बळीराम रावसाहेब फुके हे दोघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जिल्ह्याबाहेरील चोरीच्या गुन्ह्याचे धागेदोरे देऊळगाव राजापर्यंत पोहोचल्याने परिसरात या कारवाईची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *