मलकापूर : शहरातील मूलभूत सुविधांचा पूर्णतः बोजवारा उडाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने अक्षय तृतीयेच्या दिवशी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत मलकापूर नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. न.प. प्रशासन व निवडून आलेले पदाधिकारी नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क न.प. इमारतीत घागर पूजून ‘श्राध्द’ आंदोलन केले.
गेल्या चार महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यानंतरही शहरात कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. उलट स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिव्यांग निधी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराचे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत. शहरात साफसफाईचा पूर्ण बोजवारा उडाला असून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्च होत असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात शहरात स्वच्छता दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पाणीपुरवठ्याची स्थितीही अत्यंत बिकट झाली असून नागरिकांना तब्बल १५ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे. परिणामी अनेकांना विकत पाणी घेण्याची वेळ येत आहे. दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीचे वितरण वेळेत होत नसल्याने त्यांना न.प.च्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यासोबतच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
दरम्यान, न.प.मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची असतानाही अनेक जण अद्यापही रजिस्टरवर हजेरी लावत असल्याने प्रशासनातील शिस्तीचा अभाव स्पष्ट होत आहे. कामकाजात नियोजनाचा अभाव व वेळकाढूपणा दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात आज (१९ एप्रिल) आंदोलन करण्यात आले. न.प. प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करत, एक महिन्याच्या आत मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी शालीकराम पाटील, राहुल तायडे, बलराम बावस्कर, निलेश चोपडे, नागेश सुरंगे, अनिल गोठी, संजय इंगळे, करण नायसे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
न्यायालयात जाण्याचा इशारा
मलकापूर नगर परिषदेचा कारभार पूर्णतः अकार्यक्षम झाला असून नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे प्रश्न गंभीर असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लवकरच न.प.ची विद्यमान बॉडी बरखास्त करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती
अजय टप, जिल्हा उपप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष यांनी दिली
