Headlines

एटीएममध्ये कार्ड अडकले अन् शेतकऱ्याला ५५ हजारांचा गंडा; शेगावातील घटना

शेगाव : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे कार्ड मशीनमध्ये अडकले आणि याच परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने खात्यातील रक्कम लंपास केली. एटीएम केंद्रात कार्ड अडकल्याने निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यात आला. या प्रकारात शेतकऱ्याला तब्बल ५५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, शेगाव शहरात ही घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एकनाथ भगवान माळी (वय ४७, रा. झाडगाव, ता. शेगाव, ह. मु. जगदंबा नगर, शेगाव) हे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १.४५ वाजेदरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकातील गजानन सोसायटी परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी व्यवहार सुरू असताना त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्येच अडकले. वारंवार प्रयत्न करूनही कार्ड बाहेर न आल्याने ते एटीएम केंद्राबाहेर आले आणि पत्नीला फोन करून याबाबत माहिती देत होते. मात्र, याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करीत बँक खात्यातून तब्बल ५५ हजार रुपये काढून घेतले. काही वेळातच खात्यातील रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात येताच माळी यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अप. क्र. ६९१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश गाडगे करीत आहेत. एटीएम केंद्रात कार्ड अडकल्यास अनोळखी व्यक्तीची मदत न घेता तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *