Headlines

सुटाळा खुर्दमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, दोन दुचाकीही लंपास

खामगाव : सणासुदीच्या काळात बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, सुटाळा खुर्द परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी घरांचे टाळे आणि कडी-कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच दोन मोटारसायकली चोरून नेण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ३१ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुटाळा खुर्द येथील अनिकट रोड परिसरातील रहिवासी गजानन दिनकराव तायडे यांच्या घरातील कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र, अंदाजे किंमत १ लाख रुपये, ३ ग्रॅम सोन्याची रिंग, किंमत ९ हजार रुपये, २५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय मंगेश मुकुल देशपांडे यांच्या घरातून २ हजार रुपये, तर रवी बबनराव धावणे यांच्या घरातून ३० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान, आशीष संजय वेरूळकार यांच्या अंगणात उभी असलेली १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, तर श्रीकृष्ण परिसरातील अन्य एका ठिकाणाहून २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची माहिती आहे. एकाच रात्री अनेक ठिकाणी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे.
या प्रकरणी १ नोव्हेंबर रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी केलेल्या या चोऱ्यांमुळे सुटाळा खुर्द परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *