Headlines

जुन्या वादाची ठिणगी; तरुणाच्या पोटात चाकू खुपसला, देऊळगाव राजातील माळीपुरा परिसरातील घटना; जालना येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू

देऊळगाव राजा : जुन्या भांडणाची धुसफूस पुन्हा उफाळून आल्याने माळीपुरा परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. यावेळी चाकूने केलेल्या हल्ल्यात सोमेश प्रणयकांत डांगे (वय २८, रा. माळीपुरा) यांच्या पोटावर वार करण्यात आल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या सोमेश यांच्यावर जालना येथील कलावती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास माळीपुरा परिसरात सोमेश डांगे आणि केतन विजय तिडके यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान केतन तिडके याने चाकूने सोमेश डांगे यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. चाकूहल्ल्यात सोमेश हे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर सोमेश यांचे वडील प्रणयकांत श्रीराम डांगे (वय ६६) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून केतन विजय तिडके, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते यांनी केली. चाकूहल्ल्याच्या या घटनेमुळे माळीपुरा परिसरात खळबळ उडाली असून, देऊळगाव राजा पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!