Headlines

सामाईक बांधावरील झाड ठरले वादाचे कारण; शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार, जीवे मारण्याचीही धमकी!

देऊळगाव राजा : शेताच्या बांधावरील एका झाडाच्या मालकीवरून सुरू झालेला वाद थेट कुऱ्हाडीने हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याची घटना सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात घडली. सामाईक बांधावरील झाड तोडण्यास हरकत घेतल्याने दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जखमी केल्याचा आरोप असून, फिर्यादीच्या पत्नी व मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात शंकर कोंडीबा वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश ज्ञानदेव वाघ (वय ५०, रा. सिनगाव पांगरी) आणि शंकर कोंडीबा वाघ (रा. सिनगाव पांगरी) यांची शेती शेजारीशेजारी आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शंकर वाघ हा दोघांच्या सामाईक बांधावरील झाड तोडत असल्याचे अंकुश वाघ यांच्या निदर्शनास आले. यावेळी अंकुश वाघ यांनी झाड का तोडत आहात, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित झाड आपल्या बांधावर असल्याचे सांगत शंकर वाघ याने वाद घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि शंकर वाघ याने अंकुश वाघ यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या पत्नी व मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर अंकुश वाघ यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार देऊळगाव राजा पोलिसांनी शंकर कोंडीबा वाघ याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!