Headlines

नागझरीत शेतमजुराच्या घराला आग; कापूस, गहू अन् संसारोपयोगी साहित्य जळून खाक

शेगाव : शेतात कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजुराच्या घराला अचानक आग लागल्याने संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. घरात साठवून ठेवलेला पाच क्विंटल कापूस, दोन क्विंटल गहू आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने खांदे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (२ नोव्हेंबर) तालुक्यातील नागझरी येथे घडली असून, या आगीत सुमारे ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लक्ष्मण खांदे (वय ३०, रा. नागझरी, ता. शेगाव) हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास त्यांचे नातेवाईक योगेश पवार यांनी फोन करून त्यांच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच खांदे यांनी कुटुंबीयांसह घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले होते. पाहणी केली असता घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले. या आगीत घरातील साहित्याचे १० हजार रुपये, पाच क्विंटल कापसाचे २० हजार रुपये, दोन क्विंटल गव्हाचे दोन हजार रुपये आणि इतर घरगुती साहित्याचे १० हजार रुपये, असे एकूण ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी रामेश्वर खांदे यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *