बारा वर्षांचा संसार, दोन मुलांना सोडून इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी महिलेचा हट्ट; साखरखेडा पोलिसांसमोर घडला कौटुंबिक पेच! प्रियकरासोबतच राहण्याच्या भूमिकेवर महिला ठाम
बारा वर्षांचा संसार, दोन मुलांना सोडून इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी महिलेचा हट्ट; साखरखेडा पोलिसांसमोर घडला कौटुंबिक पेच! प्रियकरासोबतच राहण्याच्या भूमिकेवर महिला ठाम
साखरखेर्डा : सोशल मीडियावरून जुळलेली ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि त्यातून तब्बल १२ वर्षांचा संसार मोडण्याची वेळ आल्याचा प्रकार साखरखेर्डा परिसरात समोर आला आहे. दोन लहान मुलांची आई असलेल्या महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या ३० वर्षीय युवकासोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला. २ नोव्हेंबरच्या रात्री साखरखेर्डा पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रसंगात पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाइकांनी केलेले समुपदेशनही निष्फळ ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह होऊन १२ वर्षांचा संसार सुरू होता. या संसारात तिला दोन मुले असून मोठ्या मुलाचे वय दहा वर्षे, तर लहान मुलाचे वय चार ते पाच वर्षे आहे. दरम्यान, लांबच्या नात्यातील सुमारे ३० वर्षीय युवकासोबत तिची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. दोघांमधील जवळीक वाढत गेल्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. अखेर महिलेने चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन संबंधित युवकासोबत घर सोडले. हे दोघे एका गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी महिलेचा पती, काका, चुलत भाऊ तसेच अन्य नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सर्वांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बराच वेळ तिचे समुपदेशन केले. मात्र, ‘माझे खरे प्रेम त्याच्यासोबत आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला पतीसोबत राहायचे नाही,’ अशी ठाम भूमिका महिलेने घेतली. विशेष म्हणजे, नातेवाइकांनी वारंवार समजावून सांगूनही महिलेचा निर्णय बदलला नाही. प्रकरण मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने साखरखेर्डा पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी महिलेला मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, मेहकरला जातानाही आपण प्रियकरासोबतच त्याच्या वाहनात बसून जाणार, असा हट्ट तिने धरला. अखेर दोघेही मेहकरच्या दिशेने रवाना झाले. या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित नातेवाइकांना मोठा धक्का बसला. बारा वर्षांच्या संसारात दोन मुलांचे संगोपन सुरू असताना सोशल मीडियावरील ओळखीतून निर्माण झालेल्या संबंधांमुळे कुटुंबात निर्माण झालेला हा पेच चर्चेचा विषय ठरला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर करताना वैयक्तिक नातेसंबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचाही विचार होणे गरजेचे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.