मोताळा : मलकापूर-मोताळा मार्गावरील धोकादायक वळण पुन्हा एकदा अपघाताचे कारण ठरले. राजूरजवळ भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर कारचेही मोठे नुकसान झाले. मात्र, अपघातावेळी कारमधील एअरबॅग्ज तत्काळ उघडल्याने दोन महिलांसह कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील रहिवासी गिहे आणि त्यांचा मित्र हे दुचाकी क्रमांक एमएच २८ एएल ३५१८ ने बुलढाण्याकडून मोताळ्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, मोताळ्याकडून बुलढाण्याकडे जाणारी नेक्सॉन कार क्रमांक एमएच ०५ एफबी २१८२ आणि दुचाकी यांची राजूरजवळील धोकादायक वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील गिहे आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अपघातग्रस्त कार कल्याण-मुंबई येथील दत्तात्रय जानराव पाटील यांच्या मालकीची आहे. ते आईच्या तेरवीच्या कार्यक्रमानिमित्त धोनखेड येथे आले होते. कार्यक्रम आटोपून दोन महिला नातेवाईकांसह बुलढाण्याकडे जात असताना हा अपघात घडला. गोविंद प्रजापती हे कार चालवत होते. धडकेनंतर कारमधील एअरबॅग्ज वेळेवर उघडल्याने कारमधील दोन्ही महिलांसह सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. अन्यथा या भीषण धडकेत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या अपघातामुळे मलकापूर-मोताळा मार्गावरील राजूरजवळील धोकादायक वळणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.