साखरखेर्डा : बसस्थानक परिसरात दोन गटांतील वादातून हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असून, शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा दोन गटांत तुफान राडा झाला. काठी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला चढविल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकावरील हाणामारीनंतर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या दोन्ही गटांनी पोलिस कर्मचाऱ्यांसमक्ष पुन्हा वाद घातला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवडाभरात बसस्थानक परिसरात घडलेली ही दुसरी हाणामारीची घटना असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास साखरखेर्डा बसस्थानक परिसरात दोन गटांत वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील व्यक्तींनी काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर करीत एकमेकांवर हल्ला चढविला. या घटनेत विजय हनुमान जैस्वाल, नंदकिशोर हनुमान जैस्वाल, गोपाल भिमराव शिराळे आणि सुरेश सकरू शिराळे हे चौघे गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हाणामारीमुळे बसस्थानकावर उपस्थित असलेल्या महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. हाणामारीनंतर दोन्ही गटांतील व्यक्ती तक्रार देण्यासाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, तेथेही त्यांच्यातील वाद शमण्याऐवजी पुन्हा बाचाबाची झाली. पोलिस कर्मचाऱ्यांसमक्ष झालेल्या या प्रकाराची दखल घेत पोलिस कर्मचारी संजय भानुदास पेहरे यांच्या फिर्यादीवरून विजय जैस्वाल, यश अनिल जैस्वाल, शुभम जैस्वाल, नंदकिशोर जैस्वाल, सुरेश भिमराव शिराळे आणि सुरेश सकरू शिराळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींपैकी एका व्यक्तीचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त होणे आणि त्याची तक्रार दाखल होणे बाकी असल्याने त्या अनुषंगाने पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांतील वादामागे व्यावसायिक जागेवरून निर्माण झालेला संघर्ष असल्याचे सांगितले जात आहे. विजय जैस्वाल आणि त्यांचे बंधू बसस्थानकासह परिसरातील विविध ठिकाणी अवैध दारू विक्री करीत असल्याचा आरोप आहे. तर गोपाल शिराळे यांनी साखरखेर्डा-शिंदी मार्गावर स्वतःच्या शेतात ढाबा सुरू केला असून, तेथे ग्राहकांना दारू पुरविली जात असल्याचा आरोप आहे. विजय जैस्वाल यांनी ढाबा परिसरात व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा भाड्याने घेतल्यावरून गोपाल शिराळे आणि भीमराव शिराळे यांनी त्यांना तेथे व्यवसाय करू नये, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून दोन्ही गट आमनेसामने आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. दरम्यान, साखरखेर्डा बसस्थानक परिसरात आठवडाभरात घडलेली ही दुसरी हाणामारीची घटना आहे. यापूर्वी मंगळवारी जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोर मटण आणि चिकन मार्केटच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्य व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बसस्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या या परिसरात हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव खरात करीत आहेत.