खामगाव:- येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये गर्भलिंग तपासणी करून स्त्रीभ्रूणहत्या केली जात असल्याचा आरोप करत सेंटरच्या माजी कंपाऊंडरने केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी केली. जिल्हास्तरीय चौकशी समितीने केलेल्या तपासणीत सेंटरच्या कामकाजात विविध त्रुटी आढळून आल्याने २ ऑक्टोबर रोजी जिल्हा सल्लागार समितीच्या निर्णयानंतर पीसीपीएनडीटी पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली. याबाबत जिल्हा चौकशी समितीचे प्रमुख डॉ. सुशीर चव्हाण यांनी माहिती दिली.
अरबट सोनोग्राफी सेंटरचे माजी कंपाऊंडर वैभव सुरेश देशमुख यांनी २४ ऑगस्ट रोजी संबंधित सेंटरमध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी तीन डॉक्टरांची प्राथमिक चौकशी समिती नियुक्त केली. समितीने चौकशी करून ११ सप्टेंबर रोजी आपला अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सादर केला. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हास्तरीय चौकशी समिती नियुक्त केली. डॉ. सुशीर चव्हाण, डॉ. संजीवनी भोकरे, डॉ. पाचपोहे आणि डॉ. महेश गोरे यांचा या समितीत समावेश होता. समितीने अरबट सोनोग्राफी सेंटरला भेट देऊन उपलब्ध कागदपत्रे आणि कामकाजाची पाहणी केली. तसेच सेंटरकडे रुग्ण रेफर करणाऱ्या सात डॉक्टरांचे जबाब नोंदविण्यात आले. तक्रारीशी संबंधित ऑडिओ व व्हिडीओचीही समितीने पडताळणी केल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान सेंटरच्या एफ-फॉर्ममध्ये विविध त्रुटी आढळून आल्याचे समोर आले. तसेच ऑनलाइन नोंदी आणि रजिस्टरमधील नोंदी व्यवस्थित मेंटेन नसल्याचेही समितीच्या निदर्शनास आले. या आणि अन्य त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सल्लागार समितीसमोर प्रकरण ठेवण्यात आले. समितीच्या निर्णयानंतर २ ऑक्टोबर रोजी पीसीपीएनडीटी पथकाने अरबट सोनोग्राफी सेंटरमधील सोनोग्राफी मशीन सील केली. दरम्यान, सेंटरविरुद्ध करण्यात आलेल्या गर्भलिंग तपासणीच्या मूळ आरोपाबाबत चौकशी समितीच्या अंतिम निष्कर्षात नेमके काय नमूद करण्यात आले आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.