बुलढाणा जिल्हा चोरट्यांचा बालेकिल्ला ? दिवसाढवळ्या तीन ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

साखरखेर्डा : बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून दिवसाढवळ्या घरफोड्या होत असल्याने ‘बुलढाणा जिल्हा चोरट्यांचा बालेकिल्ला झाला आहे’ असे म्हणायची वेळ आली आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सवडद, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथे चोरट्यांनी एकाच दिवशी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सवडद येथील श्रीकृष्ण अण्णाराव देशमुख यांच्या आई सुनंदाबाई देशमुख या घराला कुलूप लावून मुलांना अंगणवाडीत घेऊन गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर घराचे कुलूप उघडे असल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाट तपासले असता कानातील सोन्याच्या बाळ्या, सेवनपीस व गहू पोथ असा सुमारे चार तोळे सोन्याचा ऐवज, अंदाजे ६ लाख रुपये किमतीचा, तसेच ३० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले. दरम्यान, गावात भिक्षा मागण्यासाठी फिरणाऱ्या राज शेनफड शिंदे याला घरातून बाहेर पडताना पाच वर्षीय गौरी या चिमुकलीने पाहिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गावातील काही युवकांनी राज शेनफड शिंदे व त्याची पत्नी राधा यांचा शोध घेतला असता ते गुंजमाथा शिवारात आढळून आले. युवकांनी दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, संशयितांनी चोरीची कबुली दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. याच दिवशी पिंपळगाव सोनारा येथे कडूबा पुंजाजी कुऱ्हाडे यांच्या बंद घराचा फायदा घेत दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. तर हिवरा आश्रम येथील शिवाजी हिम्मतराव दळवी यांच्या घरातूनही ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. घर बंद असल्याची संधी साधत तीन दुचाकीस्वारांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.
याशिवाय कोराडी प्रकल्पातील तब्बल १० मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटनाही समोर आली आहे. साखरखेर्डा परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या होत असताना नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने तपासात दिरंगाई होत असल्याची चर्चा आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईबाबतही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सवडद येथील चोरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित राज शेनफड शिंदे हा शेनफड शिंदे याचा भाऊ असल्याची माहिती आहे. एकीकडे दिवसाढवळ्या घरफोड्या, तर दुसरीकडे सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद होऊनही चोरीच्या घटना सुरूच असल्याने ‘बुलढाणा जिल्हा चोरट्यांचा बालेकिल्ला बनला आहे का?’ असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. या घटनांबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बाकी असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!