मलकापूर : शेतातील सामायिक विहिरीच्या पाण्याचा वाद नातेवाईकांतील संघर्षात परिवर्तित झाला आणि दोन्ही बाजूंनी मारहाण, शिवीगाळ व धमकीचे आरोप करत पोलिसांत धाव घेतली. नांदुरा तालुक्यातील काटी येथे घडलेल्या या प्रकरणात मलकापूर ग्रामीण पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, विहिरीच्या पाण्यावरून सुरू झालेला वाद आता पोलिसांच्या दप्तरी पोहोचला आहे. काटी येथील राजकन्या नरसिंग सोनोने (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते ७ वाजेदरम्यान त्यांचे पती शेतात हरभऱ्याला पाणी देण्यासाठी गेले असताना विहिरीवर काही जणांनी दमदाटी केली. त्यानंतर ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले असता आरोपींनी मोटारसायकल अडवून वाद घातला. यावेळी पतीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पान्ह्याने डोक्यावर व पाठीवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेसह त्यांच्या मुलालाही मारहाण करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून हरसिंग सुपडा सोनोने, रेखा हरसिंग सोनोने, प्रतापसिंग सुपडा सोनोने, सुलभा प्रतापसिंग सोनोने, मोहन हरसिंग सोनोने, सोनाली प्रमोद राठोड, पूजा, सरिता मनिष डांबेराव, सचिन प्रतापसिंग सोनोने व मनिष नरसिंग डांबेराव अशा १० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने हरसिंग सुपडा सोनोने (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीत सामायिक विहिरीच्या पाण्यावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू असल्याचे म्हटले आहे. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास काही जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरात प्रवेश केला व लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व वहिनी यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. मारहाणीत पत्नी जखमी झाल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. या दुसऱ्या तक्रारीवरून नरसिंग सुपडा सोनोने, राजकन्या नरसिंग सोनोने, अजय नरसिंग सोनोने, शितल नरसिंग सोनोने, जयश्री नरसिंग सोनोने, हरमण डाबेराव, कामिणीबाई डाबेराव व गुड्डी अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामायिक विहिरीच्या पाण्यावरून सुरू झालेल्या या वादात दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप केल्याने काटी परिसरात चर्चेला उधाण आले असून, मलकापूर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.