देऊळगाव राजा : अंमली पदार्थांच्या अवैध साठवणुकीला आणि विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत अंगठा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिनगाव जहांगीर येथे एका घरावर मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ किलो ६८ ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनगाव जहांगीर येथील रमेश रोडुबा सानप (वय ६५) यांच्या घरात अंमली पदार्थाचा साठा असल्याची गोपनीय माहिती अंगठा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १६ नोव्हेंबर रोजी पहाटे १.१५ ते २.३० वाजेदरम्यान पोलिस पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी राजपत्रित अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, शासकीय पंच, फोटोग्राफर आणि वजनकाटा धारक यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घरझडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान घरातील तपकिरी रंगाच्या पिशवीत १ किलो ६८ ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. सदर अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्या फिर्यादीवरून रमेश रोडुबा सानप यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(ब) व ८(क) अन्वये कायमी गुन्हा क्रमांक ५१२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कुवारे करीत आहेत. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक आशीष इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कुवारे आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्यासह महसूल व पोलीस विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.