Headlines

कर्जाचा वाढता ताण अन् पिकांच्या नुकसानीने युवा शेतकऱ्याचा अंत, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

साखरखेर्डा : पिकांकडून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळत असतानाच डोक्यावर असलेल्या कर्जाचा ताण वाढत गेल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश बळीराम पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, पिकांचे नुकसान आणि कर्जामुळे तो आर्थिक विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
आकाश पाटील यांच्या कुटुंबाकडे चार एकर शेती आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न अपुरे पडत असल्याने वडील बळीराम पाटील आणि त्यांची दोन्ही मुले इतर शेतकऱ्यांची शेती कराराने करीत होते. आई लक्ष्मीबाई पाटील मोलमजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होत्या.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, बळीराम पाटील यांनी २०१९-२० मध्ये भारतीय स्टेट बँकेकडून कृषिकर्ज घेतले होते. मात्र, उत्पन्नात झालेली घट आणि वाढत गेलेल्या व्याजामुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. शासनाच्या कर्जमाफीच्या यादीतही आपले नाव आले नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, आकाशने यंदा गावातील एका शेतकऱ्याची दहा एकर शेती कराराने घेतली होती. या शेतात त्याने सोयाबीन आणि तुरीची लागवड केली. लागवडीपासून मशागतीपर्यंत सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सुरुवातीला पिकांची स्थिती चांगली होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
अशा परिस्थितीत शनिवारी सकाळी आकाशने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला असून, आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतर समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!