Headlines

ऑटो प्रवासात महिलेच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला; ७५ हजारांची सोन्याची पोथ गायब

खामगाव : सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा धोका कायम असताना, खामगावात ऑटो प्रवासादरम्यान एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोथ गायब झाल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली असून, घटनेच्या ११ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामशांती नगर, खामगाव येथील सी. कृष्णा मनोहर जाधव (वय ५१) या ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते १.३० वाजेदरम्यान सोन्याची पोथ मुथूट फायनान्समध्ये ठेवण्यासाठी घरून निघाल्या होत्या. बसस्थानकासमोरून त्यांनी ऑटो पकडला. या ऑटोमध्ये अन्य तीन प्रवासीही होते. टॉवर चौकात उतरून त्या फायनान्समध्ये पोहोचल्या असता, पर्स तपासताना सोन्याची पोथ गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी गेलेल्या पोथमध्ये ११० गहू मणी, तीन गोल मणी आणि एक पदक होते. सुमारे १५ ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या दागिन्याची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ऑटोचा तसेच दागिन्यांचा शोध घेतला; मात्र काहीच हाती लागले नाही. अखेर अज्ञात चोरट्याने ऑटो प्रवासादरम्यान पर्समधून सोन्याची पोथ चोरल्याचा संशय व्यक्त करत १७ नोव्हेंबर रोजी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चोरीच्या या प्रकाराचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *