मोताळा : रस्त्याच्या कडेला मुलासोबत नाश्ता करण्यासाठी बसलेल्या तरुणाला भरधाव ओमनी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील तरवाडी बसस्टॉपजवळ ३० सप्टेंबर रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरवाडी बसस्टॉपजवळील हॉटेल परिसरात बन्सिलाल कनासे हे आपल्या मुलासोबत रस्त्याच्या बाजूला बसले होते. त्याचवेळी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील दीपक भगवानसिंग शिंदे हा एमएच-०८-आर-२३१९ क्रमांकाची ओमनी कार भरधाव वेगाने चालवत त्या ठिकाणाहून जात होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अथवा निष्काळजीपणे वाहन चालवल्याने कारने बन्सिलाल कनासे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मृतकाचा भाऊ हिरालाल प्यारसिंग कनासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी कारचालक दीपक भगवानसिंग शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ व १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुपडासिंग चव्हाण करीत आहेत.