मलकापूर : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करत आठ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत जनावरांसह बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजताच्या सुमारास भालेगाव रोडवरील कुरेशी मोहल्ला, पारपेठ परिसरात गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता मोहम्मद दानिश शेख जमिल (वय २४, रा. मोताळा) हा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ०३ सीपी ९९४६ मधून आठ गोवंश जनावरांची वाहतूक करताना आढळून आला. पिकअपमध्ये जनावरांना अत्यंत दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी आठ गोवंश जनावरांना ताब्यात घेतले. त्यामध्ये गाय, वासरू, गोहा आणि वासरी यांचा समावेश आहे. या जनावरांची किंमत १ लाख ५ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो पिकअपची किंमत ३ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोकॉ नवल नंदराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद दानिश शेख जमिल याच्याविरुद्ध अप. क्र. ७२९/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ मधील कलम ५, ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(डी), (ई), (एफ), (एन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.