Headlines

शेतात पाणी न पोहोचल्याचा जाब विचारताच पतीचा संताप अनावर; दारूच्या नशेत पत्नीला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण

मोताळा : शेतातील पाण्याचा प्रश्न विचारणे एका विवाहित महिलेला चांगलेच महागात पडले. दारूच्या नशेत घरी आलेल्या पतीला शेतात पाणी का आले नाही आणि दारू पिऊन का आला, अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला शिवीगाळ करीत प्लास्टिकच्या पाईपने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार येथे १४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जवळा बाजार येथील सौ. सरला सुनील ढोकणे (वय ३४) यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचे पती सुनील उखर्डा ढोकणे हे नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आले होते. यावेळी शेतात पाणी आले नाही आणि तुम्ही दारू पिऊन घरी का आला, अशी विचारणा पत्नीने केली. मात्र, या किरकोळ विचारण्याचा राग आल्याने पतीने संतापाच्या भरात पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करीत लाथाबुक्क्यांनीही तिला बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना घरातील सदस्यांनी मध्यस्थी करून पत्नीची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी सरला ढोकणे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी पती सुनील ढोकणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सुरडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *