मोताळा : कौटुंबिक वादातून पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत देराणीला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी जेठाणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे टाकरखेड गावात चर्चा सुरू झाली आहे. नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील सौ. पुनम भगवान जाधव यांनी यासंदर्भात बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १३ नोव्हेंबर रोजी शेतातील पिकाला पाणी देण्याच्या कारणावरून त्यांचा जेठ विष्णू जाधव यांच्यासोबत वाद झाला होता. या वादानंतर त्यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, याच तक्रारीचा राग मनात धरून १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुनम जाधव या त्यांचे लहान सासरे तुकाराम जाधव यांच्या घरासमोर उभ्या असताना त्यांची जेठाणी मिनाबाई विष्णू जाधव तेथे आल्या. त्यांनी पुनम यांच्याशी वाद घालत, पतीविरुद्ध पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा तुला पाहून घेईन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एवढेच नव्हे तर शेताकडे एकटी जाताना तुला पाहून घेईन, अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पुनम भगवान जाधव यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी मिनाबाई विष्णू जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९६ आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुपडसिंग चव्हाण करीत आहेत.