मलकापूर : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर मुख्य पोस्ट ऑफिससमोर दोन धारदार तलवारी बाळगून फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे चार हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त केल्या असून, शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास शहर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मुख्य पोस्ट ऑफिससमोर एक व्यक्ती शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला. यावेळी मिर्झा जीशान बेग मिर्झा कलीम बेग (वय ३६, रा. पिल्लू तकिया परिसर, मलकापूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता दोन धारदार स्टीलच्या तलवारी आढळून आल्या. सुमारे ८० सेंटीमीटर लांबीच्या या तलवारींपैकी एका तलवारीला लाल रंगाचे, तर दुसऱ्या तलवारीला निळ्या रंगाचे म्यान होते. दोन्ही तलवारींची एकूण किंमत सुमारे चार हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ३७ (१) (३) अन्वये लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचेही उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोकॉ आसिफ गफ्फार शेख यांच्या तक्रारीवरून मिर्झा जीशान बेग याच्याविरुद्ध अप. नं. ७३५/२०२६ नुसार शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.