Headlines

वयाच्या १७व्या वर्षीच काळाने हिरावला कुटुंबाचा आधार! कामावर जाताना चक्कर येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; चार बहिणींचा एकुलता एक भाऊ हरपला

धा. बढे : वय खेळण्या – बागडण्याचे, शिक्षण घेऊन भविष्य घडविण्याचे; मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच खांद्यावर जबाबदारीचे ओझे घेऊन मोलमजुरी करणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी रोज कामावर जाणाऱ्या नवल राजू बोरसे याचा अचानक मृत्यू झाल्याने एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. या घटनेने धा. बढे परिसरात शोककळा पसरली असून, चार बहिणींच्या एकुलत्या एक भावाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धा. बढे येथील नवल बोरसे हा मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, काही अंतरावर जाताच त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याने कुटुंबीयांसह नागरिकांनाही मोठा धक्का बसला. नवलच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील हेअर सलून चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. चार बहिणींमध्ये नवल हा एकुलता एक भाऊ होता. घरची परिस्थिती लक्षात घेऊन कमी वयातच त्याने मोलमजुरी करण्यास सुरुवात केली होती. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून आई-वडिलांना आर्थिक हातभार लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या या तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लाडक्या मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांचा आक्रोश आणि एकुलत्या एका भावाला गमावलेल्या चार बहिणींचे दुःख उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारे होते. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नवलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका कष्टकरी कुटुंबाच्या स्वप्नांना अवघ्या १७व्या वर्षीच पूर्णविराम मिळाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *