Headlines

दोन महिन्यांपूर्वी घरात चिमुकल्याचे आगमन, मात्र पितृछत्र हरपले! २६ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या; हिवरखेड पूर्णा गावावर शोककळा

 

दुसरबीड : ज्या घरात दोन महिन्यांपूर्वी चिमुकल्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण फुलले होते, त्याच घरावर काळाने घाला घातला. अवघ्या २६व्या वर्षी एका युवा शेतकऱ्याची जीवनयात्रा संपल्याने दोन महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. शेतीतील अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याची गावात चर्चा असून, हिवरखेड पूर्णा येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील वैभव विठोबा भुसारी (वय २६) या युवा शेतकऱ्याने १६ नोव्हेंबर रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैभव हा शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र, शेतीतील अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि कर्जाचा वाढता ताण अशा परिस्थितीमुळे तो विवंचनेत असल्याची गावात चर्चा आहे. याच नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे वैभवच्या संसारात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी देवानंद नावाच्या चिमुकल्याचे आगमन झाले होते. बाळाच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच अचानक वैभवच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या वयात मुलाने वडिलांचा आधार आणि मायेचा स्पर्श अनुभवायला हवा, त्याच वयात त्याच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचे हरपले आहे. वैभवच्या पश्चात आई-वडील, वृद्ध आजी-आजोबा, बहीण आणि अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या तरुणाच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला असून, या घटनेमुळे हिवरखेड पूर्णा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *