मलकापूर : घरासमोरील अंगण झाडताना उडणारी धूळ शेजाऱ्यांच्या घरात जात असल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. संतापाच्या भरात एका व्यक्तीने फावड्याने डोक्यावर वार करून शेजाऱ्याला जखमी केले, तर त्याच्या मुलानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरखेड येथील रहिवासी नरेंद्रसिंह गुलाबसिंह राजपूत (वय ४०) हे १२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगण झाडत होते. यावेळी समोर राहणारे रविंद्रसिंह मन्नूसिंह राजपूत यांनी घटनास्थळी येत, अंगण झाडू नका, तुमच्यामुळे आमच्या घरात धूळ येते, असे म्हणत आक्षेप घेतला. त्यावर नरेंद्रसिंह यांनी आपण आपल्या घरासमोरील अंगण झाडत असल्याचे सांगितले. मात्र, याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर संतापात होताच रविंद्रसिंह यांनी घराच्या ओट्यावर ठेवलेले फावडे उचलून नरेंद्रसिंह यांच्या डोक्यात मारले. या वारामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता घटनास्थळी आलेल्या प्रविणसिंह रविंद्रसिंह राजपूत यांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेप्रकरणी नरेंद्रसिंह राजपूत यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अप. क्र. ३६/२०२६ अन्वये रविंद्रसिंह राजपूत आणि प्रविणसिंह राजपूत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) व ११५(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.