धाड : वाहनांमध्ये ठेवलेल्या रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर नजर ठेवून संधी साधत हात साफ करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांचा धाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वाहनातून दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढत दोन सराईत आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीची संपूर्ण दोन लाखांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपींच्या चौकशीत जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील दुचाकी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या वाहनात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. भरदिवसा किंवा गर्दीच्या ठिकाणी वाहनांवर नजर ठेवून चोरी करणाऱ्या या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धाड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैलानी परिसरात धडक दिली. तेथून दोन सराईत आरोपी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामू वेंगा दुसन तोटीनायकर, रा. तिरुचिरापल्ली, तामिळनाडू आणि कमासा मारमुत्तू तोटीनायकर, रा. वाकीपाडा, जि. नंदुरबार यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता चोरीस गेलेली संपूर्ण दोन लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील चौकशीदरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. त्यामुळे या कारवाईतून केवळ धाड येथील चोरीचाच उलगडा झाला नाही, तर आंतरजिल्हा गुन्हेगारीचे धागेदोरेही समोर आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे व धाड पोलीस पथकाने ही कारवाई केली. वाहनांमध्ये रोकड किंवा मौल्यवान वस्तू ठेवून निष्काळजीपणा करणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.