मलकापूर : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठवणूक सुरू असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. लखानी चौक परिसरातील महेश एजन्सीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त केला. या कारवाईत ११ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एजन्सी चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग, बुलढाणा येथील अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लखानी चौकातील महेश एजन्सीवर तपासणी करण्यात आली. यावेळी एजन्सीचे संचालक आशिष चंपालाल मालपाणी (वय ४८, रा. लखानी चौक, मलकापूर) यांच्या दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. यामध्ये स्वीट सुपारी, विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित पान मसाला आदी पदार्थांचा समावेश होता. या साठ्याची एकूण किंमत ११ हजार ९०५ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करत जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपळे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अप. क्र. ८७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.