जलंब : घरगुती वाद सुरू असताना व्हिडिओ शूटिंगवरून झालेल्या वादात एका महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास जलंब येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जलंब येथील रहिवासी सौ. कविता सुरेंद्र गव्हांदे यांचा त्यांच्या पतीसोबत घरगुती वाद सुरू होता. यावेळी संबंधित वादाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यात येत होते. ही बाब लक्षात येताच सौ. गव्हांदे यांनी संबंधित इसमास हटकले. त्यावरून वाद अधिक चिघळला. दरम्यान, आरोपी राजेश शामराव इंगळे व सचिन फुलकर यांनी फिर्यादी महिलेसोबत वाद घालत काठीने मारहाण केली तसेच शिवीगाळ केली. या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी सौ. कविता गव्हांदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. १३४/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका नन्हेखा तडवी करीत आहेत.