जलंब : खामगाव – नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आमसरी येथील हॉटेल शिवगुरूजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसरी येथील हॉटेल शिवगुरू परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाला भरधाव व निष्काळजीपणे येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन देवराव आडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलंब पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक २०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जलंब पोलीस करीत आहेत.