जागेच्या वादातून कुटुंबावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

शेगाव : शहरातील धनगर फैल भागात जागेच्या वादातून एकाच कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गोरखनाथ देवकते (वय ३९, व्यवसाय चालक, रा. धनगर फैल, वार्ड क्र. ०४, शेगाव, सध्या मुक्काम अंबरनाथ ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कायम अप क्रमांक २६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी म्हणून विकी कैलास करे, उमा विकी करे व कुंदाबाई कैलास करे (सर्व रा. धनगर फैल, शेगाव) यांचा समावेश आहे.
     या बाबत सविस्तर वृत्त असे की,  २४ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी असताना त्यांच्या आई-वडिलांचा आरोपी विकी करे याच्यासोबत जागेच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळल्याने आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. फिर्यादीने यास विरोध केला असता आरोपींनी तिघांनी मिळून त्यालाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, एका आरोपीने विटेचा तुकडा फेकून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली भुवईजवळ मारल्याने तो जखमी झाला असून त्यातून रक्तस्राव झाला. याशिवाय फिर्यादी व त्याच्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्रावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका रामदास घट्टे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!