Headlines

पहुरजिरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास; सहा महिन्यांत ५ ते ६ घरफोड्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जलंब : येथून जवळच असलेल्या पहुरजिरा येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत गावात ५ ते ६ घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहुरजिरा येथील वैभव गजानन भालदाणे हे कुटुंबासह घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील बेडरूमचा कडी-कोंडा व कुलूप तोडले. त्यानंतर दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटांचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली २ लाख रुपये रोख रक्कम तसेच ५ तोळे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत २ लाख ५० हजार रुपये, असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत वैभव भालदाणे यांनी जलंब पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४४/२०२६, कलम ३०५ (अ), ३३१ (४) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, पहुरजिरा येथे गेल्या सहा महिन्यांपासून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत जवळपास ५ ते ६ घरफोड्या झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही अद्याप एकाही चोरीचा तपास लागला नसल्याने नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी गावात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!