तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून २५ लाखांची लूट; अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा, दोघे जेरबंद

खामगाव : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याकडून २५ लाखांची रोख रक्कम लुटणाऱ्या दोन तोतया आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत अटक करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या जलद आणि तांत्रिक तपासामुळे या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला.
बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात आरोपींनी खामगाव येथील एका व्यापाऱ्याला सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून धमकावत २५ लाखांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले.बपोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने खामगाव-बाळापूर मार्गावरील सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत हार्दिक मनोजकुमार गुरबानी (वय २२, रा. सिंधी कॉलनी, खामगाव) आणि साहिल नंदकिशोर नय्थानी (वय २५, रा. बीएचआर नगर, खामगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यातील संपूर्ण २५ लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण २७.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!