हुंड्यासाठी छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : माहेरहून वाहन खरेदीसाठी एक लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. रोशनी प्रशांत सोनवणे (वय २५, रा. भीमनगर, मलकापूर) यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले की, पती प्रशांत अंबादास सोनवणे (वय ३०) यांच्यासह सासू कस्तुरा अंबादास सोनवणे (वय ६०) व सासरे अंबादास त्र्यंबक सोनवणे (वय ६२, सर्व रा. मिरा रोड, भाईंदर, मुंबई) हे वाहन खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत होते. पैसे न आणल्यास घरात नांदू देणार नाही तसेच फारकत देऊ, अशी धमकी देण्यात येत होती. तसेच पती दारूच्या नशेत मारहाण करत असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. सासू-सासरे पतीला भडकवून शिवीगाळ करत असल्याने आपल्याला सतत शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध अप. क्र. ४६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!