Headlines

दोघांचा मृत्यू अन् कारमध्ये सापडला २६ किलो गांजा; खामगावात खळबळ!

खामगाव : नागपूरच्या दिशेने निघालेल्या एका कारचा टेंभूर्णा बायपास उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत कारमधील दोघांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, अपघातानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता तब्बल १३ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा २६ किलो ६७० ग्रॅम गांजा आढळून आल्याने या घटनेला वेगळेच वळण मिळाले. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जीजे ०६ बीवाय १८०४ क्रमांकाचा कंटेनर नागपूरच्या दिशेने जात होता. याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच ३० एएफ ८३८५ क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारचालक सतीष सखाराम जाधव (वय ५३, रा. माडाखळी, ता. जि. परभणी) आणि सय्यद फिरोज सै. महेबुब (वय ४६, रा. हिंगोली) हे दोघे गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता त्यामध्ये २६ किलो ६७० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत १३ लाख ३३ हजार ५०० रुपये असल्याचे समोर आले. त्यामुळे अपघाताच्या तपासादरम्यान गांजा वाहतुकीचा प्रकारही उघडकीस आला.
याप्रकरणी कंटेनरचालक साबीर अली इतजार अली (वय २४, रा. रुकुनपुरधामोदर, ता. जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरून मृत कारचालक सतीष सखाराम जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, ३२४(४), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, ११९/१७७ अन्वये खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय कारमध्ये गांजा आढळल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वयेही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *