खामगाव : तालुक्यातील चितोडा गावात एका ४७ वर्षीय व्यक्तीने नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, धिरेंद्र चक्रधर हिवराळे (वय ४७, रा. चितोडा, ता. खामगाव) यांनी १८ जून रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी गावालगतच्या नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत मयताचे चुलत भाऊ निलेश मोहन हिवराळे (वय ३८, रा. चितोडा) यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या तोंडी अहवालावरून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.