Headlines

तुरीच्या पिकातील तण नष्ट करण्यासाठी फवारणी; उपचारादरम्यान अकोला येथे सोडला प्राण

खामगाव : शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधांची फवारणी करतात. मात्र, याच फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने एका २७ वर्षीय शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुरीच्या पिकातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणावर खामगाव आणि अकोला येथे उपचार करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी घडली.
खामगाव तालुक्यातील पोरज येथील अमरसिंग केसरसिंग बोराडे (वय २७) हे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी स्वतःच्या शेतात तुरीच्या पिकावरील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करण्यास गेले होते. फवारणी सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दुपारच्या सुमारास घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांना उलटी झाली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना अकोला येथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २९ ऑक्टोबर रोजी पोरज येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती मृतक अमरसिंग यांच्या कुटुंबीयांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *