दर्यापूर : किरकोळ वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याने दर्यापूर शहरातील बुटी चौक परिसरात मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, बंदुकीचा धाक दाखविल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भैय्या अनिल गवई हे आपल्या काही सहकाऱ्यांसह जुन्या तहसील कार्यालयासमोरील जुन्या ग्रामीण रुग्णालय परिसरात गेले होते. यावेळी अंकित घाटे नामक व्यक्तीने त्यांना अडविल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शिवीगाळ करीत बंदुकीचा धाक दाखविल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दर्यापूरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात काही व्यक्तींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, अंकित घाटे हा घटनास्थळावरून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमागील नेमके कारण आणि हाणामारीत सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.