देऊळगाव घुबे : चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटा येथे शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात देऊळगाव धनगर येथील ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव विनोद एकनाथ चेके (वय ४०, रा. देऊळगाव धनगर) असे असून, ते मोटारसायकलने चिखलीहून मेहकरकडे जात होते. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक एमएच २८ बीपी ०५९२ असा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद चेके हे मेहकरकडे जात असताना विरुद्ध दिशेने चिखलीकडे शेतमाल घेऊन येत असलेल्या बोलेरो पिकअप (एमएच २८ बीबी ३५६१) वाहनाशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बोलेरोच्या मागील चाकाचा टायर फुटला, तर चेके हे रस्त्याच्या कडेला असलेल्या जाळीत फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या दुर्दैवी घटनेमुळे देऊळगाव धनगर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.