बुलढाणा : जुन्या वादाची धुसफूस मनात ठेवून १० ते १२ जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाच्या घरावर धडक देत आधी घरासमोरील दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात घुसत कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. याच गोंधळात एका महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कारंजा चौक परिसरातील तिरुपती मंगल कार्यालयासमोर ८ सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आकाश दळवी, प्रकाश उर्फ टिल्लू गोरले यांच्यासह १० ते १२ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता संबंधित कुटुंबीय गोगाजी महाराजांची मिरवणूक पाहून घरी परतले होते. कुटुंबातील सदस्य जेवण करीत असतानाच आकाश दळवी, प्रकाश उर्फ टिल्लू गोरले यांच्यासह १० ते १२ जण त्यांच्या घरासमोर आले. या जमावाने घरासमोरील दुचाकीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी घराचा दरवाजा बंद केला. मात्र, आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेच्या पतीला शिवीगाळ करीत त्याच्यासोबत लोटपाट करण्यात आली. हा प्रकार थांबविण्यासाठी पीडितेची सासू आणि मुले पुढे आली असता त्यांच्यासोबतही धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या गोंधळात आकाश दळवी याने आपला हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आकाश दळवी, प्रकाश उर्फ टिल्लू गोरले यांच्यासह १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ३३३, ७४, ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत.