बुलढाणा : दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बुलढाणा-अजिंठा मार्गावर घडली. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी येथील शिरसाट कुटुंबीय अल्टो कार क्रमांक MH 12 AN 9666 ने बुलढाण्याहून आपल्या गावी जात होते. दरम्यान, बुलढाणा-अजिंठा मार्गावर त्यांच्या कारला स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 30 AA 7498 ने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातात अल्पवयीन प्रतीक्षा विवेक शिरसाट (वय १३) हिचा जागीच मृत्यू झाला. तर विवेक संतोष शिरसाट आणि किरण विवेक शिरसाट हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. या घटनेमुळे शिरसाट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.