Headlines

मंदिरातील किरकोळ वादातून तलवारीचा धाक; नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, बुलढाणा येथील घटना

बुलढाणा : देवीच्या आरतीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने पुढे गंभीर स्वरूप धारण केल्याने बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांना तलवारीसह लोखंडी रॉड आणि बंदुकीसारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवकांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूनेही दळवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार करण्यात आली असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता आकाश दळवी हे आपल्या सहकाऱ्यांसह कारंजा चौकातील दुर्गा देवी मंदिरात आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी निखिल शर्मा तसेच त्यांचे दोन मुलगे आर्यन शर्मा आणि वंश शर्मा तेथे आले. जुन्या राजकीय वादाच्या कारणावरून दळवी यांच्यासोबत त्यांचा वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी अश्लील शिवीगाळ करून गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप असून, वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिलक तोंडीलायता यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर घटनेचा जाब विचारण्यासाठी आकाश दळवी हे निखिल शर्मा यांच्या घरासमोर गेले असता पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी शर्मा यांनी घरातून लोखंडी तलवार, लोखंडी रॉड तसेच बंदुकीसारखे दिसणारे शस्त्र बाहेर आणल्याचा आरोप आहे. तसेच दळवी यांना उद्देशून धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निखिल शर्मा, आर्यन शर्मा आणि वंश शर्मा यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, निखिल शर्मा यांच्या बाजूनेही पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. आकाश दळवी हे आपल्या १० ते १५ कार्यकर्त्यांसह रात्रीच्या वेळी घरात बेकायदेशीरपणे घुसले आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीचीही पोलिसांकडून चौकशी सुरू असून, दोन्ही बाजूंच्या आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!