Headlines

उसनवारीचे ४० हजार रुपये मागणे पडले महाग; शेतकऱ्यावर दगडाने हल्ला

देऊळगाव राजा : उसणे दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना गिरोली बु. येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल साहेबराव चव्हाण (वय ३४, रा. गिरोली बु., ह.मु. साईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कुसळकर, संतोष रामदास पिटकर, गणेश रामदास पिटकर, राहुल शिवाजी शिंदे व आरती राहुल कुसळकर (सर्व रा. गिरोली बु.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीने आरोपी राहुल कुसळकर याला मुलाच्या उपचारासाठी ४० हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले असता दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि जवळील दगड डोक्यात मारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात अनिल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. दरम्यान, संतोष पिटकर, गणेश पिटकर आणि राहुल शिंदे यांनीही घटनास्थळी येऊन चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पूजा अनिल चव्हाण व शीतल प्रभाकर मुधोळकर यांनाही आरती राहुल कुसळकर हिने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ संजय गोरे करीत आहेत. विशेष म्हणजे, याच घटनेप्रकरणी दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!