मेरा बु. : बायगाव बु. येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील सुमारे ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल अंढेरा पोलिसांनी शंभर टक्के हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केला. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत करण्यात आला. अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील बायगाव बु. येथे १८ मार्च रोजी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी दोन घरांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने व अन्य मालमत्ता लंपास केली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून ७८.५७० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ५ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल तसेच ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच-३७-वाई-९३४७) जप्त करण्यात आली. या प्रकरणी रवी प्रदीप पवार (रा. मोटेगाव, ता. रिसोड, जि. वाशिम), निलेश जगन शिंदे आणि उमेश जगन शिंदे (दोघेही रा. धानोरी, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल दत्तू विष्णू खरात, भारत ताकतोडे आणि शिवनारायण ताकतोडे (रा. बायगाव बु.) यांना परत करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे, नितीन फुसे तसेच पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव उपस्थित होते. दरोड्याचा उलगडा करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळवून देण्यात अंढेरा पोलिसांनी यश मिळविल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.