Headlines

वाघजाळ येथे पहाटेची धडक कारवाई; ४.४५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले; तिघांवर गुन्हा दाखल

मोताळा : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी पहाटे धडक कारवाई करत ४ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाघजाळ फाटा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली असून तिघांविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने २१ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास वाघजाळ फाटा येथील राजेंद्र शिंबरे यांच्या घराजवळील रिकाम्या जागेवर छापा टाकला. या कारवाईत योगेश गणेश गाडेकर व आकाश गाडेकर (दोघेही रा. वाघजाळ, ता. मोताळा) यांच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा व मारुती सुझुकी कार (क्र. एमएच १९ ओपी २७१५) असा एकूण ४ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी योगेश गाडेकर, वाहनमालक आकाश गाडेकर तसेच गुटख्याचा पुरवठादार म्हणून खामगाव येथील निलेश राठी यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील गुटखा तस्करी व अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!