देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दे. राजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीनबी इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी म्हणून मेधा सतीश घाटे, तन्मय प्रकाश घाटे व राहुल ओमकार घाटे (तिघेही रा. साईनगर, देऊळगाव राजा) यांची नावे नमूद आहेत. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता घडली. तक्रारदार महिला घरी असताना आरोपी त्यांच्या घरात घुसले. त्यांनी ‘इकबाल खान कुठे गेले?’ अशी विचारणा केली. संबंधित व्यक्ती घरी नसल्याचे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला. वाद चिघळल्याने आरोपींपैकी तन्मय घाटे याने महिलेच्या उजव्या मांडीवर चाकूने वार करून तिला जखमी केले. तसेच उर्वरित आरोपींनी चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यानंतर जिवे मारण्याची धमकी देत आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे पीडित महिलेने स्वतःच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, घरात घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे संजय नगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.