मुरूमाच्या वादातून महिलेस मारहाण; पाच जणांवर गुन्हा

मेरा बु. : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री रामेश्वर केदार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या संगीता प्रल्हाद नागरे यांच्या कुटुंबीयांसोबत छोट्या-मोठ्या कारणांवरून नेहमीच वाद होत असतात. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास संगीता नागरे या फिर्यादीच्या घरासमोर येऊन “तुम्ही आमचा मुरूम घेतला” असा आरोप करत वाद घालू लागल्या. फिर्यादीच्या आईने आरोप फेटाळत “आम्ही मुरूम घेतलेला नाही” असे सांगितल्यावर वाद अधिक चिघळला. यावेळी संगीता नागरे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये गेली असता आरोपींनी तिच्यासह तिच्या आईला लोटपाट करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादारांनी संगीता प्रल्हाद नागरे, संजय प्रल्हाद नागरे, गणेश प्रल्हाद नागरे, प्रल्हाद लक्ष्मण नागरे (रा. अंढेरा) तसेच विठ्ठल किसन मुंडे (रा. नागनगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!