बुलढाणा : भीमजयंतीच्या उत्साहात रंगलेल्या शहरात रॅलीनंतर काही तासांतच एका युवकाचा निर्घृण खून झाल्याने बुलढाणा शहर हादरले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील कैकाडीपुरा परिसरात ही थरारक घटना घडली असून, हल्लेखोर अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ येथील राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू हा भीमजयंती रॅलीत सहभागी झाला होता. रॅली संपल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास तो बाजार लाईन परिसरातील लालाजी आईस्क्रीम दुकानासमोर उभा असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सोनू वसंत जाधव (वय २५) या युवकाने गुप्तीने पप्पूवर सपासप वार केल्याचे समोर आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात पप्पूला बचावाची कोणतीही संधी न मिळाल्याने तो जागीच कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील पप्पूला तातडीने दुचाकीवरून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून फॉरेन्सिक पथकाकडूनही तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, भीमजयंतीच्या सर्व रॅली शांततेत पार पडल्या असताना रॅलीनंतर घडलेल्या या खुनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सोनू जाधव हा पूर्वीपासूनच पप्पूवर डाव साधून असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनैतिक संबंधातून वाद निर्माण झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथके तयार केली असून, त्याचा शोध सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.