देऊळगाव राजा : शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला असून, घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप दशरथ ससाने (वय ४२, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा) हे २६ जून रोजी दुपारच्या सुमारास दुर्गापुरा परिसरातील आरोपीच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी लक्ष्मण कोल्हे (वय ५०, रा. देऊळगाव राजा) याने फिर्यादीस जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करत, “तुमची औकात आहे का भोजनालयात जेवायची?” अशा अपमानास्पद शब्दांत हिणविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीने या शिवीगाळीस विरोध केल्यानंतर आरोपीने लाकडी दांड्याने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या खांद्याला व मनगटाला दुखापत झाली. तसेच त्यांना हॉटेलमधून बाहेर हाकलून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६, ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s) व ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे करीत आहे.