Headlines

चोरीच्या मालासह तिघे जेरबंद; ३.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत मलकापूर शहर डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; विविध चोरीच्या गुन्ह्यांची उकल

मलकापूर : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने धडाकेबाज कारवाई करत विविध चोरीच्या गुन्ह्यांतील ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मलकापूर शहर पोलीस ठाण्यात २७ जून २०२६ रोजी अपराध क्र. ४७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे व डीबी पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तक्रारदाराच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन अज्ञात इसम चोरी करताना दिसून आले. त्यानंतर डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पंतनगर परिसरात धाड टाकली.
या कारवाईत शेख साबीर शेख अहमद (वय ३२), जावेद खान मुसा खान (वय ३८, दोघे रा. सायकलपुरा) आणि मो. सोहेल मो. रफीक (वय २९, रा. पंतनगर, मलकापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत आरोपींनी विविध चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे १ लाख रुपयांचा हाऊस वायर, ५० हजार रुपयांचे कृषी साहित्य, ६० हजार रुपयांचे प्लंबिंग साहित्य, ६० हजार रुपयांचे महावितरण कंपनीचे केबल आणि १ लाख ३० हजार रुपयांचे चार मोटार पंप असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे आणि पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रवीण गवई, योगेश तायडे, गणेश बरडे, दीपक सोनोने, नवल राठोड, मिनल शिंदे तसेच पोलीस ठाण्यातील होमगार्ड यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!